अशोक खरातवर ची सर्वात मोठी कारवाई, पहाटे नाशिकसह पुण्यात ११ ठिकाणी छापा, फार्महाऊसवरही सर्च ऑपरेशन

Foto
नाशिक : नाशिकचा भोंदूबाबा अशोक खरात याच्याभोवती आता ईडीकडून फास आवळला जात आहे. आज पहाटेपासून ईडीने अशोक खरात याच्याशी संबंधित एकूण ११ ठिकाणांवर छापेमारी केली जात आहे. नाशिक, पुणे आणि शिर्डी अशा एकूण ११ ठिकाणी ईडीच्या पथकांनी सर्च ऑपरेशन राबवल्याने मोठी खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे, यामध्ये बँकिंग क्षेत्राशी संबंधित समता संस्थांचाही समावेश असल्याची माहिती समोर येत आहे.

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, ईडीने अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने ही कारवाई केली आहे. नाशिक शहरातील पाच वेगवेगळ्या ठिकाणी ईडीचे अधिकारी तपास करत आहेत. यामध्ये अशोक खरात यांचा तृप्तबाला बंगला आणि समता पथसंस्थेचाही समावेश आहे. अशोक खरात याने समता पतसंस्थेच्या माध्यमातून अनेक गैरव्यवहार केल्याचा आरोप आहे. नाशिक पोलिसांनी केलेल्या तपासाच्या आधारे काही दिवसांपूर्वी ईडीने अशोक खरात विरोधात गुन्हा दाखल केला होता.

आता ईडी अ‍ॅक्शनमोडवर आली असून खरातशी संबंधित एकूण ११ ठिकाणी छापेमारी केली आहे. यात शिर्डीसह पुण्यातील प्रत्येकी तीन ठिकाणांचा देखील समावेश आहे. मिरगाव येथील ईशान्यश्वर मंदिराजवळ असलेल्या ब्रह्मानंद फार्म हाऊसवर देखील ईडीकडून छापेमारी करण्यात आली आहे.

सोमवारी पहाटेचा सूर्य उजाडण्यापूर्वीच ईडीच्या अधिकार्‍यांनी संबंधित ठिकाणी धाड टाकली. नाशिकमधील अशोक खरात यांच्या निवासस्थानी अधिकार्‍यांचा मोठा ताफा तैनात असून, घरातील कागदपत्रे आणि आर्थिक व्यवहारांचा कसून तपास केला जात आहे. संशयास्पद आर्थिक व्यवहारांच्या तपासासाठी ही कारवाई केली जात असल्याचे समजते.

समता बँकेवर ईडीची करडी नजर
या कारवाईचे सर्वात महत्त्वाचे केंद्र म्हणजे समता बँक. अशोक खरात यांच्याशी संबंधित असलेल्या या बँकेतही ईडीने छापेमारी केली आहे. बँकेतील व्यवहारांमध्ये काही अनियमितता आढळली आहे का किंवा मनी लाँड्रिंगचा काही प्रकार आहे का? या दृष्टीने तपास यंत्रणा शोध घेत आहेत.